Sunday, August 30, 2020

पूजा

मूर्ति पाहिली तुझी देहभान लोपले!
मावळले जगच सर्व शांत शांत वाटले!ध्रु.

तू विष्णू, तू शंकर, तू गणेश अच्युता 
मनही तूच, पवन तूच, गगन तूच अच्युता
मिटले हे नयन तरी दीप हे प्रकाशले १

हात जोडता तुला अश्रुपूर लोटला
स्तोत्रगान करु जाता कंठ पूर्ण दाटला
चित्तचोर तू असा मला न भिन्न ठेवले २

चालता इथे तिथे तीर्थ गमन होय ना 
पाहता इथे तिथे विषय तूच लोचना 
कर्म जे करातले तू हि पुष्प मानले ३
 
कधी कुठे  कुणा कसा भासलास मोहना
जया जसा तया तसा तूच तूच होय ना
तमास भेदतात हे ज्ञानकिरण कोवळे!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(मूर्तिपूजा हा परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा छोटेखानी ग्रंथ वाचताना)
२.९.१९८९

No comments:

Post a Comment