Sunday, August 2, 2020

हे श्लोक पाच तू नित्य वाच..

'मी देह नव्हे, मन बुद्धि नव्हे'
हे पुनःपुन्हा घटवावे - 
'चल मना उंच, गगनात राम'
मन अभ्यासात रमावे!१

सद्गुरु आत विश्वात तोच
ही श्रद्धा तर अनमोल
तू भाग्यवंत जगतात सत्य
तो सावरि ढळता तोल!२

जे घडे त्यात कल्याण असे
अंतरात कोरुन ठेवी
भय लेश नको, शंकाहि नको
जगि निष्ठावंत सुदैवी!३

इंद्रिये द्वाड करु नको लाड
घे संयम थोडा शिकुनी
जो आत वळे त्या हरि मिळे
हरिपाठ पहावा जगुनी!४

नैराश्य नको, आलस्य नको
बन मनुजा तू उद्योगी
दिस नित्य नवा, क्षण नित्य नवा
उत्साह तुला उपयोगी!५

हे श्लोक पाच तू नित्य वाच
तव दृष्टिकोण बदलेल
जाशील जिथे रमशील तिथे
जगि हवा हवा होशील!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१.६.१९९१

No comments:

Post a Comment