गणपति बाप्पा ये प्रतिवर्षी
मुलामुलींशी खेळायला!ध्रु.
मुलामुलींशी खेळायला!ध्रु.
ओळख होते अक्षरातुनी
वळणदार ओंकार पाहुनी
उच्चाराने श्रवण नि दर्शन
ना तुलना या गमतीला!१
कोणी तुजला श्री म्हणताती
विघ्न हराया समर्थ वदती
अथर्वशीर्षाचे आवर्तन
शिकवी जीवन जगण्याला!२
पाशांकुश ही दोनच शस्त्रे
झुळझुळीतशी दोनच वस्त्रे
गुणगंभीरा हे रणधीरा
शब्द न पुरती स्तवनाला!३
निराकार साकार तसा तू
प्रणवाचा उच्चार तोच तू
संगीतातुन चित्रकलेतुन
ओळख होते आम्हाला!४
आनंद तू येताजातांना
हवाहवासा असा पाहुणा
तुझ्यासारखी प्रसन्नता दे
बाप्पा अवघ्या विश्वाला!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३.९.२००१
No comments:
Post a Comment