Wednesday, August 5, 2020

रामजन्म

मनात राम जन्मला
तनात राम खेळला!ध्रु. 

नामरूप राम तो
रामदास सांगतो
राम लावितो लळा!१

'मी न देह' जाणवे
'मी न बुद्धि' जाणवे
बोध मोदवी मला!२

राम हा इथे तिथे
मीहि तोच वाटते
ध्यास लावि सावळा!३

का निराश व्हायचे ?
रडायचे? अडायचे?
यत्न देव थोरला!४

रामरंगि रंगणे
मोहपाश भंगणे
असाच राम जन्मला!५

राम जागवी मला
राम बैसवी मला
कंठ आज दाटला!६

मुक्तिलाभ होतसे 
नित्य भेट होतसे
काय वानु सोहळा!७

समर्थयोग राम रे
समर्थभक्ति राम रे
देहभाव लोपला!८

पुढे पुढेच जायचे
का कुणास भ्यायचे?
निश्चयो असा भला!९

सोबती असो, नसो
ध्येय जे मनी ठसो
क्रमीन पंथ एकला!१०

नित्य राम जन्मतो
मजसवेच बोलतो
ध्यानछंद लागला!११

भाग्यवंत मी असे
रामदास होतसे
शीत वाटती झळा!१२

जोम जीवनी मिळे
भक्तिरोपटे डुले
अश्रुपूर लोटला!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.४.१९८७

No comments:

Post a Comment