ऊठ उठ मोरया, सरली निद्रेची वेळा
लाव लाव भजना, दयाळा प्रभो जगत्पाला!ध्रु.
लाव लाव भजना, दयाळा प्रभो जगत्पाला!ध्रु.
बाप्पा तुज म्हणता नाते सुंदरसे जडते
कर नकळत जुळती मस्तक झणी नम्र होते
मनपण घालव रे, नमन तुज विश्वचालकाला!१
शुंडा तव वळते तसे तू वळव मना आत
पाश तुझा टाक, बांध या गात्रा नियमात
समरसता लाडू दे प्रभो नित्य साधकाला!२
करी मना शांत, वास ना वासनेस राहो
मंगलमूर्ती तू कृपा या दासावर होवो
पुनर्जन्म नित्य, हवे बळ साधन घडण्याला!३
स्वरूप आनंद नांदतो कसा आत आत
अनुभवता खुलतो भाविका अनंत हा पंथ
पावसि परमेशा श्रद्धा दे चरणी अमला!४
तू तारी मारी करिशि जे त्यातच कल्याण
श्रीरामा नसते पडत ती कशाचीच वाण
दूर्वादल माथी हरित ते सुखवी सकलाला!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.२.१९९८
No comments:
Post a Comment