Tuesday, August 4, 2020

पतितपावन श्रीराम.


पतितांना पावन करी, असा श्रीराम एक भूवरी!ध्रु. 

तळमळ तळमळ निशिदिनि होते
रामभेटीची ओढ लागते
चरणस्पर्शे पावन झाली सती अहल्या खरी!१

पश्चातापे तनमन पोळे
शांत कराया अश्रु धावले
पातक सगळे धुवून टाकुन रामचंद्र उद्धरी!२

संतसंगती राम देतसे
उत्कर्षाचा मार्ग खुलतसे
झाले गेले ते गंगार्पण वास राम मनि करी!३

प्रत्येकाला भविष्य आहे
घडवायाची संधी आहे
निराशेतुनी फुलवी आशा स्वामी भवभय हरी!४

टाकीचे आघात सोसणे
जसे घडवितो तैसे घडणे
पाषाणातुन मूर्ति प्रकटे कारागिरी ही खरी!५

चुकता चुकता शिकता येते
पडता पडता बाळ चालते
करुणासागर राममाउली बालकास सावरी!६

संकट असते एक कसोटी
धैर्य लाभते श्रद्धेपोटी
खचू न देई जराहि हिंमत नाम स्मर अंतरी!७

धीर धरी रे धीरापोटी
असती मोठी फळे गोमटी
कवि केशवसुत सांगुन गेले चिंतन त्यावर करी!८

नियमांनी मन बांधुन घ्यावे
व्रती बनावे तपी बनावे
निश्चयबळ ते वाढत जाते घे घे अनुभव तरी!९

हवी दक्षता क्षणाक्षणाला 
काय करी विषयाचा घाला
संरक्षक श्रीराम भरवसा संतत हृदयी धरी!१०

कर्म न टळते कधी कुणाला
निजकर्माचा का कंटाळा?
परिश्रमाने जीवन घडते पाठ गिरव तू तरी!११

अंधारातुन प्रकाश उमले
हलके हलके पूर्वा उजळे
गगनसदन तेजोमय बनते रवि येता अंबरी!१२

अशाश्वताचा मोह नसावा
शाश्वत त्याचा ध्यास असावा
विवेकबंधू तुझा सोबती तुजला सोबत करी!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment