तूच आपण, शब्द सुचवुन, गीत जुळवुन ऐकवी
कृष्णरंगी रंगवावी श्रीहरी रे भैरवी!
कृष्णरंगी रंगवावी श्रीहरी रे भैरवी!
काय झाले या मनाला, शांतवावे त्या कसे?
मोरपीसच हास्य कृष्णा, या मना शिकवू कसे?
मोहना हे पूर्णकामा या मनाला बोधवी!
देह गोकुळ, चित्त व्याकुळ, कृष्ण ना कोठे मिळे
जे खरे माझ्याचपाशी ते न का मजला मिळे?
ही अहंता ने लयाला, भेद सगळा घालवी!
गोकुळी या भक्ति राधा माय होती वत्सला
जन्मदा ना, नवल कैसे नंदनंदन हासला
ते निरागस सौख्य लाभे जीवनाच्या शैशवी!
कृष्णनामा आळवीता कंठ प्रेमे दाटतो
भरुनि येती फिरुन डोळे पूर वाहू लागतो
हे मुकुंदा भाववेड्या भाविकाला बोलवी!
इंद्रियांचा हा पसारा आवरावे त्या कसे
बासरी तू वाजवी रे, गोधना जमवी कसे
संयमे साधे समाधी संगती कृष्णा हवी!
श्रावणाचा मास ऐसा होतसे तव आठव
आठवा तू, आठवे तुज, तिमिर सगळे घालव
शरद ऋतुचा चंद्र जैसा हास्य वदनी खेळवी!
कर्म माझे मी करावे दे परी तू प्रेरणा
कृष्ण कर्ता, फलहि त्याला जागवी ही भावना
चिंतनाने घरच मंदिर स्वप्नपूर्ती ती हवी!
"देह नच मी, तोच आत्मा" ना उपाधी कोणती
दुःख नाही, सुखहि नाही वेगळी ऐसी स्थिती
तू तुझी गीता मुकुंदा मम मुखातुन ऐकवी!
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.८.१९८९
No comments:
Post a Comment