Monday, August 24, 2020

श्री गजाननमहाराज भक्तिस्तोत्र - ३


शेगावीच्या गजानना तुज भल्या पहाटे वंदावे 
शब्दामागुन शब्द सुचावे भावपुष्प  हे उमलावे ।।१।।

आजानुबाहू दिगंबरा हे सुवर्णकांती लखलखते
'गण गण गणात बोते' गाता विश्वाशी जुळले नाते ।।२।।

अन्न ब्रह्म हे ध्यानी येण्या शिते शिते सेवन केली 
गढूळ कसले ही तर गंगा जलात गंगा पाहियली ।।३।।

गजानना तू शंकर भोळा सद्भावाची भूक तुला 
चून भाकरी अगदी प्यारी भक्तीचा नैवेद्य तुला ।।४।।

द्वाड इंद्रिये खट्याळ घोडे नामाचा लावुनि दोर 
सुशांत केले निवांत केले खोड्यांचा सरला जोर ।।५।।

नुसती काडी धरली तरिही चिलीम घेते, पेट कशी? 
चमत्कार छे यौगिक लीला सहज दाविली सुंदरशी ।।६।। 

गाय जगाची असते आई जखडायाचे तिला कसे 
मीच वासरू असे भावुनी नाते जुळवा सुंदरसे ।।७।। 

मी मधमाशी, कणसे ती मी, डंखाचे भय काय मला? 
सुखदुःखांचा लेप न कसला पूजक पूज्यहि मीच मला ।।८।।

नरनारी हा भेद वरिवरी सगळी रूपे देवाची 
वासनेस ना अवसर येथे देवघेव हो प्रेमाची।।९।।

दुही राक्षसी निर्दालावी एकपणा तो जाणावा 
द्वेष नि मत्सर घात साधती जो तो भाविक दक्ष हवा ।।१०।।
 
भोग भोगुनी सारायाचा टिळकांना भाकर दिधली 
रहस्य गीतेचे उलगडले हाती आली गुरुकिल्ली ।।११।। 

ऊस घेऊनी झोडपले परि योगी विचलीत ना झाला 
मारत्यास रस यथेच्छ दिधला जागविला मनि जिव्हाळा ।।१२।।

महारोग तो खरा मनाचा गुलाम जो तो देहाचा 
नव्हे देह मी या बोधाने मानव सागर ज्ञानाचा ।।१३।।

पलंग पेटे भान न याचे गीता आली आचरणी 
दिव्यत्वाची दिली प्रचीती उभ्या जगाला सद्गुरुनी।।१४।।

'तो मी विठ्ठल' असे दाविले भावामध्ये देव असे 
मनमोकळा उदार हसरा विश्व सदन त्याला भासे ।।१५।।

काम आपुले चोख करावे परिणामाची का चिंता ? 
मधुर बोलणे गोड वागणे संतांची जीवनगाथा ।।१६।।

पोथी घ्यावी दासगणूंची ओवी ओवी वाचावी 
मनन करावे समर्थ वदती आतुन वृत्ती बदलावी।।१७।।

सज्जनगडचे रामदास ते शेगावीचे गजानन 
शेगावीच्या गजाननावर लुब्ध जाहले गुणी जन ।।१८।।

माणुसकी हा धर्म खरोखर सदाचार ही खूण असे 
उभ्या जगाला दूध देत ती गाय वंद्य माताच दिसे।।१९।। 

मन कोणाचे नच दुखवावे गजाननाची पूजा ही 
दीनदुःखिता हृदयी धरावे गजाननाची गीता ही ।।२०।।

श्रीरामाला प्रसाद अवचित त्या लाभाने गहिवरला 
श्रीगजानन जय गजानन परिसर गंधित झालेला ।।२१।।

।।शुभं भवतु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment