घन अंधारी संकट भिववी
भयकंपित मन घशास सुकवी
घडीघडी ते जिवास रडवी
धीर द्यावया कुणा बोलवू
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १
भयकंपित मन घशास सुकवी
घडीघडी ते जिवास रडवी
धीर द्यावया कुणा बोलवू
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १
अधरी मुरली तू धरलेली
हळवी फुंकर श्रवणी आली
सर्व इंद्रिये आसुसलेली
तनुची मुरली करुन वाजविल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? २
मला वाटते अर्जुन व्हावे
अवधानाचे दानच द्यावे
सर्व सुखा सत्पात्र बनावे
अभाविकाला भाविक करण्या
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ३
हे माधव हे तुझेच लाघव
तूच मला चरणांशी बैसव
मला परत दे माझे शैशव
सुदाम पेंद्या बनविल मजला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ४
दोष तुला तरि कैसा द्यावा
भोग भोगुनी सहज सरावा
संतांचा तर हा सांगावा
अनुभवांनी ज्ञान पुरविता
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ५
भाग्यच माझे संकट येते
पदोपदी मज सावध करते
चपळ मनाला आत वळविते
गुरुकृपाही समजविण्याला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ६
व्यक्ती पांडव समाज माधव
धर्मास्तव तर सगळे बांधव
जे जे दुर्गुण ते ते कौरव
खलनिर्दालन करील ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ७
भक्ताचा हा धावा ऐकुन
धीर द्यावया येई आतुन
सुचेल तैसे घे घे लिहवुन
आचरिण्याला युक्ती शिकविल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ८
आई दणके जरी घालते
राग विसरते लाडू देते
हलक्या हाते मग थोपटते
अंगाई सोsहं गाणारा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ९
कर्तव्याचे भान असावे
विकारवश मी कधी न व्हावे
मी माझे हे लयास जावे
वरप्रार्थना स्मरणी आणिल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १०
श्रावणमासी पहिल्या दिवशी
अंतरात या कैसा येशी?
मला कृपांकित नकळत करशी
अवघड सगळे सोपे करवी
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? ११
देहदुःख सुख मानत जावे
मनास अपुल्या उलट करावे
नाम निरंतर गावे ध्यावे
मन पवनाला जोडिल ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १२
गीतावाचन गीताचिंतन
गीताचिंतन गीतादर्शन
गीतादर्शन भक्तोद्धारण
गीतामृतनवनीत द्यावया
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १३
मूर्तीमध्ये दर्शन घ्यावे
जनी जनार्दनि त्यास पहावे
अनुसंधाना तुटो न द्यावे
जीवनशिक्षण शिकवी मजला
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १४
सुखदुःखेही येती जाती
सहन करावी ओळखुनी ती
शहाणे न कधि करती खंती
वज्रासम तन करील ऐसा
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १५
कंटाळा हा शब्दच घालव
उत्साहाचे अपूर्व वैभव
देउनि नैराश्याला घालव
लोहाला या सुवर्ण बनवी
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १६
देह द्वारका ध्यानी आले
मनसिंहासन तुला अर्पिले
अश्रूंनी तव चरण भिजविले
नित्याचा वास्तव्या येई
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १७
तू कर्ता रे तूच करविता
तू असशी मायेच्या परता
कोटि कोटि वंदने अच्युता
मानसपूजा मानुन घेइल
श्रीकृष्णा रे तुजविण कोण? १८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३.८.१९८९
No comments:
Post a Comment