Saturday, August 22, 2020

श्री



मनी 'गणपति', लिहावयाला, एकच अक्षर श्री पुरे!

शुभारंभ विद्येचा झाला, पहावयाला श्री पुरे

सुबक आकृती, प्रसन्न वृत्ती, स्मितहास्याला श्री पुरे

रंगावलि रेखाया स्फूर्ती, आत उपस्थित श्री पुरे

'मी नच कर्ता', बिंबायाला, श्रींची इच्छा भाव पुरे

श्री ही लक्ष्मी, गणेश ही श्री, समाधान धन पुरे पुरे

हत्तीवर अंबारी मधले डौलदार श्री खरेखुरे

चला उठा, कार्याला लागा, उत्तेजन श्री दे निकरे

शूरामागे सगळे शुभ ग्रह श्री देती यश सार खरे

साहसात श्री, प्रयत्नात श्री, अनुभूतीचे बोल खरे

आत्म्यावर विश्वास हेच श्री, देहदुःख फसवेच बरे

सौभाग्याचे प्रतीकही श्री, मुळारंभ  श्री खरे खरे

सत्य असे श्री, शिव सुंदर श्री चिंतन निर्झर झरे झरे

ज्ञानाचा ये रवि उदयाला कृपाच श्रींची तिमिर सरे

जनात मिसळा, हसा, बागडा श्री म्हणजे स्वातंत्र्य खरे

सरला श्रावण येत भादवा श्रींच्या शिरि दूर्वाच तुरे

नर्तन गायन वादन अभिनय श्रींना रंजन सुखद बरे

प्रवचन कीर्तन श्रींच्या पुढचे उद्बोधन लहरे बहरे

स्वसंवेद्य श्री, आत्मरूप श्री, ज्ञानेशा जाणवे खरे

जशी अथश्री तशी इतिश्री साम्य गोड गहिरे गहिरे

अतुल अमित नि अमोल हे श्री राम तयांचे चरण चुरे


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२५.८.२००४

No comments:

Post a Comment