Wednesday, December 7, 2022

माझा भार दत्तावरी! तो परमहिताचे करी!


माझा भार दत्तावरी!  
तो परमहिताचे करी! ध्रु. 

दत्त फिरवितो तैसा फिरतो 
दत्त वदवितो तैसा वदतो 
झोळी खांद्यावरी! १ 

दत्तनाम या मुखात येते 
तहान सरते, भूक न उरते 
छत्र मस्‍तकावरी! २

तन दत्ताचे मन दत्ताचे 
मन दत्ताचे धन दत्ताचे 
दत्त वदे वैखरी! ३

मी माझेपण नकळत सरते 
कणकण काया मम मोहरते 
नयनी अश्रूसरी! ४

जेथे जातो दत्तच तेथे 
गुरुदत्ताची प्रचीति येते 
नाचतात लहरी! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०१.१९८९ 
नारायण महाराज केडगाव यांच्‍या चरित्रावरील काव्‍यातील हे एक काव्‍य

No comments:

Post a Comment