Sunday, December 11, 2022

मला माधवा सर्व गीता कळावी



"करू काय" हा प्रश्न जेव्हा छळे तो
स्वये जोडुनी हात मी पार्थ होतो
अहंता हरी औषधाला नुरावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!१
 
यशे होत वेडा अलाभे खचे मी 
कुणी आप्त जाता रडे मी झुरे मी 
परी आत्मसत्ता कळावी वळावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!२
 
करी कर्म तेव्हा तुझ्या आठवाने 
स्फुरो नाम कृष्णा असे आर्ततेने
सुयोगे अशा चित्तशुद्धी घडावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!३
 
अरूपा तुझे रूप ते जाणवावे 
गुणातीत तू, मी तुला आळवावे 
तुझी बासरी आत सोऽहं घुमावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!४

जसा थेंबुटा तो समुद्री बुडाला 
तसा एकला तो अनेकी रिघाला
विनंती अशी खिन्नता लुप्त व्हावी 
मला माधवा सर्व गीता कळावी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९८३

No comments:

Post a Comment