संसाराच्या दुःखावरती विजय मिळविते भक्ती!
विजय मिळविते भक्ती!ध्रु.
विजय मिळविते भक्ती!ध्रु.
दुःखाने भगवंत स्मरला
त्या दुःखाते कैसा विटला
कोसळोत शिरि भव्य दुःखगिरि सहण्या येइल शक्ती!१
पांडव जरि ते नित वनवासी
परि आठविती श्रीकृष्णासी
कधी न पडावा विसर हरीचा म्हणती शुद्धमती!२
सुख भ्रामक मृगजळ हे दुसरे
पाऱ्यासम तळहाती न ठरे
देव ठेवितो जैसे अपणा तैसे असणे शांती!३
स्वाभाविकि आवडी असावी
कृत्रिमतेची ओढ नसावी
नियुक्त कर्मे अविरत करणे श्रेष्ठ साधना जगती!४
आत्मस्थित जो साधक होई
सुखदुःखांच्या अतीत जाई
संतांचे ते असे सुलक्षण द्वंद्वातीत स्थिति ती!५
शरण गेलिया जगदंबेते
कळिकाळाचे भय ना उरते
वज्रासम मग कणखर ते मन देही भोगत मुक्ती!६
जर वाटे दुःखा जिंकावे
तनामनाने संतच व्हावे
अनुकरणातुनि नकळत कधितरि घडते शिल्पाकृती!७
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रावर आधारित हे एक काव्य.
No comments:
Post a Comment