प्रभातकाली तुझी बासरी मधुर मधुर ऐकली!
शीणभाग सरलासे सारा सुखद जाग आली!ध्रु.
शीणभाग सरलासे सारा सुखद जाग आली!ध्रु.
श्रीकृष्णा तव हसरी मुद्रा अवचित मज दिसली
अनुभूतीने अंगांगावर रोमावलि उठली
हसतमुख सदा त्या संतांना श्रीगीता कळली!१
गीता गाता भान हरपते साधे समरसता
विषाद सरला प्रसादलाभे अनुग्रहच घडता
मस्तक लवले कृतज्ञतेने नयनदले भिजली!२
उद्धारावे आपण अपणा विवेक हा सोबती
विकारविलसित जाता विलया उरली विश्रांती
नित्य नवा दिस साधकवृंदा दसरा दीपावली!३
श्यामसुंदरा, हे घननीळा कसा लागला लळा
सदनोसदनी आला बहरा भक्तीचाच मळा
आपआपली कामे करण्या जनता सरसावली!४
पीतांबर कसणारा शेला हिरवागार भला
गोड गुलाबी उपरणे तसे साजे तव तनुला
श्रीरामाच्या मनोमंदिरी कृष्णमूर्ति ठाकली!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०७.२००९
No comments:
Post a Comment