Saturday, December 24, 2022

शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला



दोन अलग जन्‍मठेपि जगाआगळा 
शिक्षेचा मी प्रहार हसत झेलला!ध्रु. 

पुनर्जन्‍म सिद्धांता मिळत मान्‍यता 
शासन हे जरि विदेशी हिंदु तत्त्वत: 
शिक्षेचे साहचर्य नित्‍यची मला!१  

योगसूत्र म्‍हणत मनी करिन चिंतना 
भोजनांति मी करीन ध्‍यानधारणा 
मायभूमि वंद्य नित्‍य सस्‍य श्‍यामला!२  

अर्धशतक अर्धशतक घाव मस्‍तकी 
छिन्‍न भिन्‍न जीवन मम येत ध्‍यानि की 
नीलकंठसम पचविन मी हलाहला!३  

काव्‍याचा विषय अता मीच जाहलो 
मीच ध्‍येय मी ध्‍याता येथ राहिलो 
या योगा विश्वांतरि अन्‍य ना तुला!४  

सूडाचे चक्र येथ फिरत गरगरा 
न्‍यायदेवताच भ्रष्‍ट छळत नरवरा 
न्‍यायदान नावाचा खेळ मांडला!५  

मृत्‍युंजय जो असतो मरत ना कधी 
त्‍यास मारणारा नच संभवे कधी 
अनादि मी अनंत मी अवध्‍य मी भला!६  

आपुल्‍याच मरणाने राज्‍य हे सरे 
दास्‍यमुक्‍त राष्‍ट्र मात्र मागुती उरे 
सत्‍याचा सूर्य तिमिरि मीच पाहिला!७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

(स्‍वातंत्र्यवीर सावरकरांना  २४ डिसेंबर १९१० या दिवशी काळ्या पाण्‍याची शिक्षा ठोठावण्‍यात आली होती त्‍या प्रसंगावर आधारित हे काव्‍य)

No comments:

Post a Comment