Sunday, December 18, 2022

प्रपंच आणि परमार्थ

 

प्रपंच हा होतच असतो, परमार्थ करावा लागे! 
देहास भुले तो गुरफटला, आत्माच स्मरावा लागे!ध्रु. 

जन्म नि मरण संसार आत्माच एक परि सार 
अभिमान भेद करणार परमार्थि न भेदविकार 
मी कर्ता हे अज्ञान जाणूनि सद्गुरू वागे!१
 
मी कर्ता फल मज हाव त्या प्रपंच ऐसे नाव 
तो कर्ता फलही त्याचे परमार्थी ऐसा भाव 
देहात असूनी नाही मग लेपहि कुठला लागे!२
 
कर्तव्य म्हणुनि कर काम, मुखि असो हरीचे नाम 
मन सहज बने निष्काम, ते सदन शांतिचे धाम 
नाथा घरी चंदन घासे दाविले स्वये श्रीरंगे!३
 
द्वैताच्या पायावरती हा प्रपंच नामक इमला 
सोऽहंचा गंध अमंद परमार्थी दरवळलेला 
हरिनाम सर्व हरि दोष हरिपाठी ज्ञाना सांगे!४
 
जो सजता सजता विटतो तो प्रपंच मायाजाल 
परमार्थ करू जाताना मन बनते सहज विशाल 
हे विश्व निकेतन माझे अदृश्य रेशमी धागे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment