Sunday, September 1, 2024

तू ठेवशील तैसे मज राहणे जमावे..

तू ठेवशील तैसे मज राहणे जमावे
रामा अखंड स्मरणी मज वाटते रहावे!ध्रु.

अधिकार ना तनी या 
मी देही बोल वाया 
सत्यार्थ हा कळावा तू दान हेच द्यावे!१

फळ पाहिजे कशाला? 
कर्तव्य भक्ति मजला 
कौशल्य त्या सुकर्मी कळसास पोचवावे!२ 

नामात राहतोसी 
नामातुनी पहासी 
सेवेत आगळ्या या देहे मुदे पडावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५३ (१ जून) वर आधारित काव्य.

कर्तेपण टाकून भगवंताच्या स्मरणात कर्तव्य करणे हाच परमार्थ. "देही मी नव्हे" हे ज्याला समजले तो मुक्तच. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. मला सुख नाही व दुःखही नाही असे ज्याला वाटेल तो मुक्त समजावा. भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे आणि भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते, तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच; आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ. फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय. पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे करतो ते कर्तव्य ठरते; आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंतांना दृष्टिआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय. भगवंत माझ्यामागे आहे ही भावनाच आपल्याला प्रपंचातून उद्धरून नेईल याची खात्री बाळगा, आणि भगवंताच्या नामात आनंदात कालक्रमणा करा.

No comments:

Post a Comment