ॐ गं गणपतये नमः ।
दगडूशेठ हलवाई गणपती, बुधवार पेठ, पुणे
गणपती दगडू हलवाईचा नयनां दिसला मनात भरला!
भव्य दिव्य ती विशाल मूर्ती, गणेश हसला अंतरि ठसला!ध्रु.
जनगणमन अधिनायक प्रभु हा
करुणाकर सुखकारक प्रभु हा
फुटीरतेचे तम निरसाया, दिव्यद्युति घेऊनिया आला!१
वक्रतुंड हा वीर विनायक
करा कार्य जन तुम्ही विधायक
मीपण पुरते हरवून टाकुन थेंब सागरी कसा मिसळला!२
अथर्वशीर्षा घेतो गाउन
मांगल्याचे करतो सिंचन
ब्रह्मरसाचा मोदक घ्यावा, प्रसाद द्याया सिद्ध जाहला!३
असे हिताचे तेच घडवितो
प्रसंगातुनी तोच शिकवितो
गणराज्याचा पाया भक्कम श्रीगणराये स्वये घातला!४
हा भक्तीचे वाढवि वैभव
हा प्रौढत्वी जपतो शैशव
गणपतिबाप्पा मने मवाळू न कळे केव्हा अंतरि शिरला!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जानेवारी/फेब्रुवारी १९९५ गणेश जयंती निमित्त प्रसिद्ध केलेलं काव्य
No comments:
Post a Comment