Thursday, September 19, 2024

पाठविशी मज जगात देवा तुझे स्मरण नित राहू दे ..

पाठविशी मज जगात देवा 
तुझे स्मरण नित राहू दे 
नामाची मज सदैव सोबत
अनुसंधानी राहू दे

जन्म होत मम जिचिया उदरी 
जननी प्रेमळ देव मला 
अनन्यभक्ती शिकता यावी 
शिकवशील ना गोपाळा 

वेदनेत सुख कसे सापडे 
चिंतन करता येऊ दे 
प्रतिप्रश्नाला असते उत्तर 
शोध तयाचा घेऊ दे

संत सांगती निजकर्तव्या 
प्राणपणाने करत राहा 
धर्म न याहुन मुळी वेगळा 
कर्मफला ची नसो स्पृहा

भगवंता रे तुझेच जग हे 
बघता दृष्टी भिरभिरली 
हास्य मुखावर प्रेमळ कर ते 
तुझी कृपा मज जाणवली 

ही नरतनु रे अफाट दौलत 
मोल तियेचे कसे करू 
आत्मोद्धारा अमोघ साधन 
सत्संगाचा छंद धरू 

प्रसववेदना आईच्या त्या
स्मरण तयाचे असो असो 
सुखात तिजला ठेवायाचे
कृतज्ञता जागती असो

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.१२.१९८९

No comments:

Post a Comment