मी रामाहुनि नसे वेगळा!
बोध असावा अंगी भिनला!ध्रु.
बोध असावा अंगी भिनला!ध्रु.
फेन जरि वरी नीर खालती
एक तत्त्व तें असंख्य भूती
अंतर्बाह्य प्रभू विलसला!१
राम सानुला जगत उपाधि
आकळेल साधुता समाधि
बंधन कुठलें परमात्म्याला?२
अखंड टिकते सत्य सत्य ते
अतूट उरते नित्य नित्य ते
ज्ञानांतरि या आत्मा रमला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५८ (६ जून) वर आधारित काव्य.
समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते.
पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजतें तेव्हां आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस "सोऽहं" म्हणत होता, आणि आतां "कोऽहं " म्हणू लागला, व शेवटी देहच मी म्हणू लागला! वास्तविक सूर्य व त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणें "मी" आणि "भगवंत " वेगळे नाहीत. परमात्मतत्त्व हे सर्वांच्या पलीकडे आहे. आपले शरीर एवढे मोठे असते पण आपला जीव किती लहान असतो. त्याप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे. हे एवढे मोठे जग त्याची उपाधि आहे. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते, म्हणजे परमात्मस्वरूप होय. त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय. भगवंताच्या स्वरूपदर्शनाच्या आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो. नामस्मरणाने हे काम लवकर होते. आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे. ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे व भगवंताशी एकरूप व्हावे.
No comments:
Post a Comment