प्रपंचातली आसक्ती काही केल्या सुटेना!
राम आम्हा भेटेना!ध्रु.
राम आम्हा भेटेना!ध्रु.
प्रेम न राही दोन ठिकाणी
सौख्य खरे श्रीरामाचरणी
कळुनि काही वळेना!१
प्रपंच कुठवर करील सोबत
नकळे केव्हा आणिल आफत
तिथे न सुख हे पटेना!२
फिरण्या जाता जशि काठी
गरज तिची आधारासाठी
ही मर्यादा कळतचि ना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७६ (१६ मार्च) वर आधारित काव्य.
प्रपंचातली आसक्ती कशी कमी होईल? प्रपंच आम्हाला सुटत नाही. भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे आहे; या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे कि, ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एकाच म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे. एखादा मनुष्य फिरावयास जाताना काठी घेतो, त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही; त्याप्रमाणे भगवंताकडे जाण्याला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. विचाराने अत्यंत पवित्र असावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंत:करणही कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंत:करण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा.
No comments:
Post a Comment