Monday, September 30, 2024

शिकविते आपणा प्रेमळ मंगलमूर्ती!

आनंदनिर्मिती असते मनुजा हाती
शिकविते आपणा प्रेमळ मंगलमूर्ती!ध्रु.

सुखदुःखांनी हे जीवन आहे भरले
निर्लेप राहुनी भोग भोगणे उरले
असुनीहि नसावे हेच बिंबवी चित्ती!१

ठेवावे मस्तक सदा सर्वदा शांत
लंघावा सहजच तीन गुणांचा प्रांत
ते स्थैर्य धैर्य दे परमशांतिची शांती!२

गुण पाहुन मन हे मना जोडुनी द्यावे
श्रीअथर्वशीर्षहि मनापासुनी गावे
कलियुगात आशास्थानच सांघिक शक्ती!३

चित्ताची समता म्हणजे आहे योग
वर्तनी सरलता संवाद आणि सह‌योग
ते कमल पसरवी श्रींची गंधित कीर्ती!४

पाशांकुश दोन्ही कौशल्ये वापरता
येतसे दंडिता दुष्टांची निर्दयता 
त्या कालमूषका गणेश वाहन करती!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२१ ऑगस्ट २००१

No comments:

Post a Comment