Sunday, September 29, 2024

गुरुचरिताची ओढ अनावर प्रभात समजा ती झाली फिटले सगळे पाप मागचे, नयनी गंगा पाझरली!

 ।। श्रीगुरुदेवदत्त ।।

गुरुचरिताची ओढ अनावर प्रभात समजा ती झाली 
फिटले सगळे पाप मागचे, नयनी गंगा पाझरली !ध्रु. 

गाणगापुरा मन हे नेते, भस्म लागते ते भाळी 
श्रीगुरु माझी मायमाऊली अंतरात ती जाणवली 
प्रसाद ऐसा दत्तप्रभूंचा द्वंद्वे सगळी मावळली!१ 

अशक्य ना परमार्थी काही श्रद्धेची बलवत्तरता 
सहन कराया आघाता दे शक्ती श्रीगुरुची सत्ता 
वियोगातही संयोगाची खूण साधका सापडली!२

मोहाचा या होम करावा समिधा ती अवधानाची 
ज्ञानज्वाला पहा उफाळे प्रकटे मूर्ती श्रीगुरुची 
दत्त दत्त हे नाम अनावर पुष्पे पदकमली पडली!३

व्यर्थी अधिकचि अर्थ सापडे हृदयी होता दडलेला 
गुरुमुखातला शब्द शब्द तो जीवा संजीवक झाला 
श्रीरामासह प्रतिभा म्हणते हीच खरी हो दिपवाळी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२९/१०/१९९७

No comments:

Post a Comment