रामावरती ठेव भरवसा, चिंता सोडी रे!ध्रु.
जीवन अळवावरचे पाणी
अस्थिरता ती घे जाणूनी
भगवन्नामी करि कर्तव्या नको डळमळू रे!१
जन्मासंगे विकार आले
साधुसंत परि तया न डरले
शांति प्रेम दया गुणरत्नां यत्ने मिळवी रे!२
विकारांवरी ठेव नियंत्रण
हळूहळू करि गुणसंवर्धन
प्रपंचात राहुनि हे शिकणे शिक्षक राम बरे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६४ (४ मार्च) वर आधारित काव्य.
आपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामात कर्तव्य करीत राहावे. भगवंतावर पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचे एकदम बंद करा. जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार असले किंवा साधु- सत्पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात् त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांति, क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात. विकारांना वश न होता, म्हणजेच त्यांचे नियमन करून गुणांचे संवर्धन करणे हे प्रपंचात मनुष्याला शिकायचे असते.
No comments:
Post a Comment