जाग रेणुके, जाग गणपती, हो जागा मारुती
भूपाळी आळवती मंजुळ विहग सुप्रभाती!ध्रु.
भूपाळी आळवती मंजुळ विहग सुप्रभाती!ध्रु.
ओढ तिघांना भेटायाची तुम्ही लावलीत
आत जाणवे जवळी जाण्या कोण चालवीत
आबालवृद्धा होते नित्यच आनंदप्राप्ती!१
परस्परांना बघता फुलती वदने आनंदे
जो तो म्हणतो आपुलकीने नमस्कार, वंदे
येथे तेथे श्रीहरि भरला दिव्यच अनुभूती!२
इथे पोचता वाटे ऐसे हवे ते मिळाले
दर्शन घडले दिवस आजचा दिपवाळी वाटले
क्षण क्षण कण कण अशीच वाढे अमुची श्रीमंती!३
कृपा अशी तुमची आम्हांवर मागावे काय
सदैव स्मरणी राहू द्यावे आपुलेच पाय
तुम्ही चालवा, तुम्ही शिकवा जगण्याची रीती!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(शिक्षक नगर/परमहंस नगर येथील टेकडी कडे जाताना मागे रेणुका माता, गणपती आणि मारुती असे मंदिर होते पूर्वी. तिथे फिरायला जात असत लोक सकाळी. अण्णा ही जात असत तेव्हा. तिथे दर्शन घेतल्यावर अण्णांना सुचलेली ही भूपाळी.)
No comments:
Post a Comment