कौसल्येस राम भेटला! देवकीस कृष्ण भेटला!
जिजाऊस शिवा भेटला! जिजाऊस शिवा भेटला!ध्रु.
हसत हसत रडती जन
रडत रडत हसती जन
दसऱ्याच्या आधी आज दीपोत्सव जाहला!१
आला आला बाळ माझा
आला आला शिवा माझा
वर्णाया येई का मातेची माया कुणाला?२
शिंगे कर्णे गर्जले
तोफांचे बार झाले-
राजगडच्या आनंदाला तट कोट नच उरला!३
शिवा कसा नटरंग
बैराग्याचे घेत सोंग
आई दिसता आनंद राखेखालुन डोकावला!४
हर्ष किती दाटला
शिवा पुन्हा जन्मला -
सुखरूप हा कलिजाचा राजा परतला!५
कमाल कमाल बुद्धीची
युक्ति गोड पेटाऱ्याची
वार्ता ही अति अद्भुत दंग करी सकलाला!६
नवे स्फुरण उसळले
मोदझरे खळखळले
देवधर्म, दानधर्म देत असे मधुर फला!७
भुत्ये आणि गोंधळी
वाजवती संबळी -
"उदो उदो अंबे तुझा" नाद कोंदला!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(आग्र्याहून सुटका झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहोचले. त्या प्रसंगावर आधारित काव्य.)
No comments:
Post a Comment