स्वार्थ नको! अभिमान नको!
श्रीरामाचा विसर नको!ध्रु.
श्रीरामाचा विसर नको!ध्रु.
उठता बसता राघव ध्यावा
राघव ध्यावा भजनी गावा
अभ्यासाचा वीट नको!१
परनिंदा विष परद्रव्य विष
परद्रव्य विष परनारी विष
पापपूर्ण अभिलाष नको!२
खेळा ऐसा प्रपंच करणे
कधी जिंकणे कधितरि हरणे
हर्ष नको तो खेद नको!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.२९७९
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३८ (सात फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी.
स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीहि अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. परनिंदेने नकळत आपण आपलाच घात करीत असतो. तुमचे आई-वडील, बायका मुले यांच्या बाबतीत असलेले आपले कर्तव्य करण्यास चुकू नका व त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होईल. ते कर्तव्य सांभाळून नीतीधर्माने वागून आपला प्रपंच करा व भगवंताचे स्मरण ठेवा. खरे समाधान मिळवल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो; त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तेथे नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने तेथे काहीच नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तेथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा यातच जन्माचे सार्थक आहे.
No comments:
Post a Comment