Saturday, September 14, 2024

स्तोत्राचा महिमा



नित्य नाम घेई । नित्य स्तोत्र गाई
निराशा नावाला। नुरणार १

कर्ताधर्ता ईश । पाठीराखा ईश
सातत्याचा ईश । भुकेलेला २

स्तोत्र हा उपाय । वत्सल ही गाय
घालवी अपाय । भाव हवा ३

लाव उदबत्ती । रामरक्षा गाई
अंगारा तो लावी। कवच ते ४

नको खेद चिंता । कलहाची वार्ता
तुला एकाग्रता । तारणार ५

मने हो सबळ । बुद्धीने हो स्थिर
तने कणखर। वज्रासम ६

उपासना कर । नेटाने चालव
येई अनुभव । तूच पहा ७

ज्याचे नाव राम । असावा निष्काम
मन शांतिधाम । त्याचे व्हावे ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२८ ऑगस्ट १९८४ नंतर 
रात्री २.३०

No comments:

Post a Comment