Saturday, September 7, 2024

धरिसी जर अभिमान, माणसा, दुरावेल तुज राम!

धरिसी जर अभिमान, 
माणसा, दुरावेल तुज राम!ध्रु.

हरिस्मरणाचा धागा घेउनी 
कर्मफुले ती द्यावी गुंफुनी 
होईल, प्रपंच मग सुखधाम!१ 

प्रपंच नाही विघ्न भक्तिला 
अहंभाव परि मुख्य अडथळा
टाळण्या, घ्यावे नित हरिनाम!२ 

लाभ होउ दे, होवो हानी
खेळगडी तिज मुळी न जुमानी
हसाया संकटि शिकविल राम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७१ (११ मार्च) वर आधारित काव्य. 

प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात ओवून करावीत, म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फार सुखकर होईल. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा विशेष करून कारणीभूत होत असतो. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक घेणे शक्य नाही. प्रपंचात नाम घेऊन व्यवहार केल्यास अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता, परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहंपणा, हा देहाभिमान टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी हसत खेळत झेलता येईल. प्रपंचातील सुखदु:खे हसतखेळत झेलावीत; आणि हे एका नामानेच साधते.

No comments:

Post a Comment